केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ, तसेच विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. काँग्रेसने वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे.
वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरला आहे. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पोटनिवडणूक व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील जवळपास ८४ जागांवर चर्चा झाली. त्यापैकी ६२ जागांवर बैठकीत एकमत झालं. या बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्याच मुलाला तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघ व विधानसभांच्या ४७ जागांसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार असून नांदेड लोकसभा मतदारसंघ व केदारनाथ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राहुल गांधी रायबरेली व वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांनी रायबरेलीची जागा ठेऊन वायनाडची जागा सोडली होती. तेथे आता प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली.
उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, सिक्कीम या राज्यांमध्ये ४८ विधानसभा आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
संबंधित बातम्या