मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahavikas Aghadi : महाआघाडीत धूसफूस..! विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसनंतर राष्ट्रवादीही नाराज

Mahavikas Aghadi : महाआघाडीत धूसफूस..! विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसनंतर राष्ट्रवादीही नाराज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 11, 2022 06:01 PM IST

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता निवडीवरून महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) कुरबुरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनेही शिवसेनेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाआघाडीतील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.

महाआघाडीत धूसफूस..!
महाआघाडीत धूसफूस..!

मुंबई – गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेला (shivsena) धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यात त्यांच्यासाठी एक गोष्ट सकारात्मक घडली ती म्हणजे, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास दानवे यांची निवड झाली. मात्र या निवडीवरून महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) कुरबुरी सुरू झाल्या आहेत. शिवसेनेने वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्यानंतर आपल्याशी कोणतीही चर्चा न केल्याचा आरोप करत काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी तर आमची आघाडी नैसर्गिक नसल्याचे नसल्याचे महाआघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही शिवसेनेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदाची निर्णय घेताना कोणतीही चर्चा केली नाही. शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, आमच्यात अशी कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभा विरोधीपक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीने पत्र देण्याआधी बाळासाहेब थोरातांशी चर्चा केली होती. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो, अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे. मात्र यासाठी अन्य घटक पक्षांचाही पाठिंबा आवश्यक आहे. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाआघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची यांची निवड करण्यात आली. मात्र, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही होती. पण शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली. 

नाना पटोले म्हणाले, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणं आवश्यक होतं. मात्र, तशी चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे.

आमची आघाडी कायमस्वरुपी किंवा नैसर्गिक नाही -

दरम्यान, महाविकास आघाडी कायमस्वरूपी असल्याचा शब्द आम्ही कधी वापरलाच नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. आमची ही काही नैसर्गिक आघाडी नाही. ही आघाडी विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यावेळी केली. आम्ही काही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा कौल आम्हाला जनतेनं दिला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती. आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली. असं नाना पटोले म्हणाले आहेत. 

WhatsApp channel