Nitin Raut News: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची माहिती समोर आली. या अपघातामध्ये नितीन राऊत थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झाली नाही. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली.
नागपूर येथील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकने नितीन राऊतांच्या कारला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच कपिल नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात नितीन राऊतांच्या कारचे नुकसान झाले आहे. तर,नितीन राऊत सुखरूप असून पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन राऊत यांच्या कारचा अपघातचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला.त्यात कारचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. अपघात कसा घडला? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
काँग्रेसने उत्तर नागपूर मतदारसंघातून नितीन राऊत यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेक तसेच अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामुळे या मतदारसंघातून कोणत्या पक्षातील उमेदवार विजयी होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नागपूर उत्तर मतदारसंघातून नितीन राऊत यांना उमेदवारी दिली. तर, भाजपने त्यांच्याविरोधात मिलिंद माने यांना उभे केले. या निवडणुकीत नितीन राऊत यांनी २० हजार ६९४ मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण ८६ हजार ८२१ मते मिळाली. तर, मिलिंद माने यांना एकूण ६६ हजार १२७ मते मिळाली.
रिपब्लिकन चळवळीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नागपूरमधून डॉ. नितीन राऊत हे १९९९, २००४ आणि २००९ साली विधानसभेवर निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या मिलिंद माने यांनी नितीन राऊतांचा पराभव केला. पंरतु, २०१९ च्या निवडणुकीत नितीन राऊत पुन्हा एकदा निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री, गृह राज्यमंत्री, जलसंवर्धन मंत्री म्हणून काम पाहिले.