मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Comrade Kumar Shiralkar: काॅम्रेड कुमार शिराळकर यांचं कॅन्सरने निधन
काॅम्रेड कुमार शिराळकर
काॅम्रेड कुमार शिराळकर

Comrade Kumar Shiralkar: काॅम्रेड कुमार शिराळकर यांचं कॅन्सरने निधन

03 October 2022, 10:40 ISTNinad Vijayrao Deshmukh

Comrade Kumar Shiralkar Death : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत काॕम्रेड कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री ८.३० वाजता डॉक्टर कराड हॉस्पिटल नाशिक येथे निधन झाले. ते २०१९ पासून कर्करोगामुळे आजारी होते.

पुणे : पँथर चळवळीत सहभागी झालेले, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात तुरुंगवास भोगलेले, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या शोषणाविरोधात अविरतपणे संघर्ष करणारे कम्युनिस्ट नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी केंद्रीय कमिटी सदस्य, काॅम्रेड कुमार शिराळकर यांचे आज रात्री नाशिक येथे कॅन्सरने वयाच्या ७४व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्यावर नंदुरबार येथील मोड येथे आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर हे २०१९ पासून कर्करोगामुळे आजारी होते. गेल्या एक महिन्यापासून पुणे, मुंबई व नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याचा अंत्यविधी कमरेड बीटी रणदिवे हायस्कूल, मोड, तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे उद्या सोमवारी सायंकाळी ४.०० वाजता होणार आहे.

कुमार शिराळकर हे महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कडवे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. गेले काही दिवस ते कर्करोगाने आजारी होते. त्यांनी २०१४ पर्यंत त्यांनी पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहिले. कॉ. सिताराम येचूरी यांच्या नेतृत्वाखाली चीनला गेलेल्या भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. ते महाराष्ट्रातील शोषित, श्रमिक, शेतमजूर, दलितांच्या चळवळींबरोबर काम करतात.

१९७४ साली शिराळकर यांची लिहिलेल्या उठ वेडया, तोड बेड्या ही पुस्तिका प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या आहेत. जाती अंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती व ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मिमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्मांधतेचे राजकारण इत्यादी विषयांवर शिराळकर यांनी लिखाण केले आहे. संदर्भ हवा पुण्यातील चालणाऱ्या मागोवा गटाचे ते सदस्य आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी, शेतमजूर यांच्यावरील शोषणाविरोधात आणि आदिवासींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी १९७० च्या दशकात त्यांनी काम केले. ते मुंबई आय आय टीचे विद्यार्थी होते. ते डाव्या विचारसरणीच्या संशोधकांचे आणि कार्यकर्त्यांचे स्फूर्तीस्थान होते.