Rohit Pawar: रोहित पवारांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल, कारण काय?
Agro Sugar Factory: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने गाळप हंगाम सुरु करण्यासाठी तारीख निश्चित केली होती. परंतु, रोहित पवार यांच्या कारखान्यात तारखे आधीच गाळप हंगाम सुरु करण्यात आल्याचा दावा भाजप नेते राम शिंदे यांनी केला. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले.
ट्रेंडिंग न्यूज
साखर कारखान्यांबाबत सरकारकडून गाळप हंगामासाठी १५ ऑक्टोबर २०२२ ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, यापूर्वीच इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दि. ८ मार्च २०२३ रोजी भिगवण पोलिसांत बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शासनाच्या मंत्री समितीच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबर २०२२ पासून उस गाळप हंगामाला सुरुवात करायची होती. मात्र, बारामती येथील अॅग्रो साखर कारखान्याने पाच दिवस आधीच म्हणजेच १० ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरु केला, अशी तक्रार मिळाल्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यात आली. दरम्यान, ७ डिसेंबर २०२२ ला या चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये अॅग्रो साखर कारखान्याने मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानंतर अॅग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.