Maharashtra Weather Updates: पाकिस्तानवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात प्रचंड गारठा वाढला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. राज्यात थंडी वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे.
देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्यात धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्धा येथील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबईतील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी बुधवारी सांगितले की, 'राज्यात येत्या आठवड्यात थंडीची लाट येण्याचा इशारा नाही. हिवाळा सुरू झाला आहे आणि तापमानात घट अपेक्षित आहे. मुंबईत तापमान १४-१५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले की थंडी जाणवते. सध्या मुंबईवर नजर टाकल्यास किमान तापमान २०-२१ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३०- ३३ अंशांच्या आसपास असेल. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान ३० अंशांच्या आसपास राहील', असेही ते म्हणाले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११-१६ डिसेंबरदरम्यान राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबच्या काही भागांमध्येही थंडीची लाट अपेक्षित आहे. उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, सौराष्ट्रमध्ये कडाक्याची येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी पडेल. तर, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये १३-१६ डिसेंबरदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, हिमाचल प्रदेश आणि १० ते १३ डिसेंबर दरम्यान दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
थंडीच्या दिवसात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे. थंडीत गरम पाण्याने दीर्घ काळ आंघोळ करणे, उबदार कपड्यांत स्वतःला गुरफटून घेणे, कमी पाणी पिणे, सतत चहा-कॉफी पिणे, बाहेर जाणे टाळणे, व्यायामाला सुट्टी देणे या सगळ्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे लक्षात घेऊन योग्य आहार घेणे, व्यायाम करणे, योग्य वेळ झोप घेणे या गोष्टी पाळण्याकडे लक्ष द्यावे.
संबंधित बातम्या