पुणे : ब्रिटीशांनी त्यांची भारतातील प्रशासकीय कामे करण्यासाठी माणसे तयार व्हावीत, या हेतूने भारतीयांना शिक्षण दिले. स्वातंत्र्यानंतर ही शिक्षणपद्धती बदलणे अपेक्षित होते मात्र, तसे झाले नाही. आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर मातृभाषेतील शिक्षणाला पुन्हा एकदा केंद्र सरकारने महत्त्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सीओईपी टेक) यांच्या वतीने आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांना 'सीओईपी अभिमान पुरस्कार २०२३' देत गौरविण्यात आले. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सीओईपी टेकच्या मुख्य सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारांचे हे ३१ वे वर्ष होते.
या वर्षीचा सीओईपी अभिमान पुरस्कार हा मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण कुदळे, अनंत डिफेन्स सिस्टिम्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक चेतन धारिया, इंडिया इलेमेंट सोल्युशन्स व कूकसन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ रवी भटकळ, बंगळूरच्या एरोनॉटिकल डेव्हलमेंट एजन्सीचे शास्त्रज्ञ डॉ विजय पटेल, अमेरिकेतील नीअर यु सर्व्हिसेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष अचलेरकर आदींना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मागील राज्य सरकारने ३३ महिन्याच्या कार्यकाळात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत असहकार पुकारला होता, मात्र आता मागील एक वर्षाच्या काळात आमच्या सरकारने यामध्ये काम सुरु केले आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी बरोबरच विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम हे मातृभाषेत भाषांतरीत केले गेले आहेत. एआयसीटी आणि आयआयटी मुंबई यांचे विशेष सहकार्य यासाठी मिळाले. आता पॉलिटेक्निकचे ६५% विद्यार्थी हे मातृभाषेतून उत्तरपत्रिका लिहिता यावी यासाठी परवानगी मागत आहेत.
संस्थेच्या चिखली येथील परिसरात नवीन इमारती, संशोधन व इनोव्हेशन पार्क विकसित होत असल्याची माहिती देत डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पना यांवर भर देऊन उद्योजकते संबंधित मार्गदर्शनासाठी आम्हाला मदत करावी. तुमच्या ‘वॉलेट शेअर’ पेक्षा ‘माइंड शेअर’ आम्हाला जास्त मोलाचा वाटतो.” सीओईपीला आयआयटी मुंबईच्या मानकांच्या बरोबरीने आणण्याचा मानस यावेळी डॉ चौधरी यांनी केला.
माजी विद्यार्थ्यांचे संस्थेशी भावनिक नाते जोडलेले असून सीओईपीचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. जलदीप दौलत यांच्या वडीलांनी आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यात असलेली १.१ कोटी रुपये इतकी रक्कम आम्हाला देऊ केली आहे. या देणगीद्वारे आम्ही एआर- व्हीआर (ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी) प्रयोगशाळा उभारीत आहोत. माजी विद्यार्थ्यांनी सहा महिन्याच्या सेमिस्टरमध्ये किमान २ तास संस्थेला देत विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, उद्योजकता आदी विषयांवर मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा प्रो एस डी आगाशे यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या