CNG price hiked by ₹2 in Mumbai: मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आल्यानंतर रिक्षा संघटनांनी शुक्रवारी सायंकाळी राज्य परिवहन विभागाला पत्र लिहून मूळ भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे आधीच महागाईचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी भार पडण्याची शक्यता आहे.
सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ होताच रिक्षा संघटनांनी शुक्रवारी सायंकाळी राज्य परिवहन विभागाला पत्र लिहून मूळ भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याची मागणी केली. सध्या मूळ भाडे २३ रुपये असले तरी सीएनजी दरवाढीचा परिणाम रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर होणार आहे. यासाठी मूळ भाडे २६ रुपये करण्यात यावे, अशी संघटनांची मागणी आहे.
भाडेवाढीच्या गरजेबाबत आम्ही विविध सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे. आमच्या गणनेनुसार मूळ भाड्यात तीन रुपयांनी वाढ करण्याची गरज आहे,' असे रिक्षा संघटनेचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले. मुंबई महानगर क्षेत्रात चार लाखांहून अधिक रिक्षा असून, त्यापैकी दोन लाख ६० हजार रिक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरात धावतात. ऑटोचे मूळ भाडे ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ रुपयांवरून २३ रुपये करण्यात आले.
सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. रिक्षाचालक दररोज आपल्या वाहनांमध्ये किमान दोन ते तीन किलो सीएनजी भरतात, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. सीएनजीदरवाढीचा फटका मुंबई महानगर प्रदेशातील किमान १० लाख सीएनजी वाहनांना बसण्याची शक्यता आहे, ज्यात पाच लाख खासगी कार आणि टुरिस्ट टॅक्सींचा समावेश आहे.
महानगर गॅस लिमिटेडआणि अदानी टोटल गॅस लिमिटेडसारख्या मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांनी इनपुट कॉस्टमध्ये २० टक्के वाढ करूनही गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ किमती तशाच ठेवल्या होत्या. प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढल्यानंतर मुंबईत सीएनजीचे दर ७७ रुपये झाले आहेत. तर, दिल्लीत सीएनजीचे दर ७५.०९ रुपये प्रति किलो, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचे दर ८१.७० रुपये प्रति किलो झाले आहेत.
व्हॅटसारख्या स्थानिक करांच्या घटनांनुसार सीएनजीचे दर प्रत्येक राज्यात बदलतात. एमजीएल आणि आयजीएलने सीएनजी दरवाढीचे कारण सांगितले नसले, तरी रेग्युलेटेड किंवा एपीएम गॅसच्या पुरवठ्यात सलग दोन वेळा झालेल्या कपातीमुळे कंपन्यांना अधिक पैसे देऊन गॅस खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे ही दरवाढ आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. एमजीएलचा दावा आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या तुलनेत सीएनजीमुळे अनुक्रमे ४९ टक्के आणि १४ टक्के बचत होते.