मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray Covid Positive: संभ्रम वाढला! उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray Covid Positive: संभ्रम वाढला! उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण

22 June 2022, 14:27 ISTGanesh Pandurang Kadam

CM Uddhav Thackeray Covid Positive: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray Corona Positive: राज्यात राजकीय पेच निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे यांच्यासोबत सुमारे ४० आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळं राज्यातील सरकार संकटात आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं… असं ट्वीट करून यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काँग्रेस नेते कमलनाथ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हे करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानं ही भेट टळली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती सकाळीच समोर आली होती. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही करोना झाल्याचं कळतं आहे. ताज्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार असल्याचं समजतं. 

उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत!

महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सोबत आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार आमच्या सोबत असून आताच्या बैठकीलाही सगळे आमदार उपस्थित होते. विधानसभा बरखास्तीचा कुठलाही विषय नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.