Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राची मान गौरवाने उंचावणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता राज्य सरकारकडून कुसाळेला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे.
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक मिळवून देणाऱ्या कुसाळेवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कौतुकांचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. स्वप्निलच्या कांस्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्निल कुसाळेचं खुप खुप अभिनंदन.. स्वप्निलची कामगिरी विशेष आहे कारण त्याने उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. या कामगिरीने प्रत्येक भारतीय आनंदी आहेत, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कुसाळेशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वप्निलला बक्षिस जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलच्या प्रशिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. त्याआधी स्वप्नीलच्या वडिलांशी एकनाथ शिंदेंनी फोनवरून संपर्क साधून त्यांचं देखील अभिनंदन केलं होतं.
जागतिक क्रीडाविश्वाच्या नकाशावर देशाचे स्थान अधोरेखित करणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. स्वप्निलचं रौप्यपदकस ०.१ ने हुकलंय. त्याची कामगिरी खूप चांगली झाली. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढला आहे. त्याच्या आईवडिलांचं अभिनंदन... स्वप्निल तू १३ कोटी जनतेचं नाव गाजवलं आहेस. महाराष्ट्र सरकारकडून आपण १ कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर करत आहोत, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्निलच्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाला सलाम, असं अजित पवार म्हणाले आहेत.
स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलं. हे पदक महाराष्ट्रासाठी खास आहे. कारण १९५२ साली खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीत ऐतिहासिक ब्राँझ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रासाठी अशी कामगिरी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने तब्बल ७२ वर्षांनी केली आहे.
स्वप्नील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचा रहिवासी आहे. सध्या तो मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासणीस म्हणून नोकरीला आहे. त्याने पदक जिंकल्यानंतर त्याला रेल्वेने पदोन्नती देण्याची घोषणा केली आहे. स्वप्नील हा पॅरिसहून भारतात आल्यानंतर त्याचा भारतीय रेल्वेकडून सन्मान केला जाईल तसेच ऑफिसर म्हणून प्रमोशन दिले जाईल, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली आहे.
संबंधित बातम्या