मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही अन् शिक्के वापरून निवेदन, मंत्रालयात खळबळ

धक्कादायक.. चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही अन् शिक्के वापरून निवेदन, मंत्रालयात खळबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 28, 2024 06:53 PM IST

CM Eknath Shinde : मंत्रालयात कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचा प्रकारसमोर आल्यानंतर खळबळ माजली आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा प्रकार सचिवालयात उघडकीस आला आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार कार्यवाहीसाठी आलेल्या १० ते १२ निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यानंतर याबाबत मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात.

बनावट सही आणि शिक्का मारल्याचं लक्षात आल्यानंतर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

IPL_Entry_Point