मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’, संभाजीनगरमधून सुरुवात

Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’, संभाजीनगरमधून सुरुवात

Mar 26, 2023 04:14 PM IST

dhanushyaban yatra : एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि मी एकटा असे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे.

‘धनुष्यबाण यात्रा’
‘धनुष्यबाण यात्रा’

उद्धव ठाकरे जिथे सभा घेत आहेत त्याच ठिकाणी त्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेत असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. मात्र आगामी काळात देखील असेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीच्या विरोधात एकनाथ शिंदे राज्यभर धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. याची सुरूवात छत्रपती संभाजीनगरमधून करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. महाआघाडीतील तिन्ही पक्षांच्या संयुक्त सभांना २ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगरमधून सुरूवात होणार आहे. महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत.

२ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात 'धनुष्यबाण यात्रा' काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या 'धनुष्यबाण यात्रे' ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू संभाजीनगर राहणार आहे. ८ किंवा ९ एप्रिलपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा या मैदानातूनच सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्याच्याबरोबर असणारे स्थानिक आमदारही या यात्रेत सामील होणार आहेत.

 

महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. याच सभेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि मी एकटा असे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. कारण भाजप अजून मैदानात उतरलेली नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४