CM Eknath Shinde skip visit ram mandir ayodhya inauguration : देशभरात राममंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. देशभरातून विविध मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुपस्थित राहणार आहेत. या बाबत त्यांनी ट्विटरवर माहिती देखील दिली आहे.
भारतात सध्या सर्वत्र केवळ राम मंदिराचीच चर्चा आहे. उद्या दुपारी १२.१५ ते १२.४५ दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल ७,००० हून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण आले होते. मात्र, ते काही कारणांमुळे या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही आहेत. याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
शिंदे यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी राम मंदिर उभरल्याबद्दल आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शिंदे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साकारले आहेत. त्यांचे यासाठी शतशः आभार. अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री यांनी लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.