मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटासोबत किती खासदार? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला आकडा

शिंदे गटासोबत किती खासदार? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला आकडा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 19, 2022 08:25 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या खासदारांसोबत ऑनलाइन बैठक घेतली होती. आज काही खासदारांसह एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

CM Eknath Shinde On Shivsena MP" शिवसेनेत ४० आमदारांच्या बंडानंतर आता लोकसभा (Lok Sabha) खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या दाव्याने आता खळबळ उडाली आहे. दिल्लीत (Delhi) पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांसोबतच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'शिवसेनेचे खासदार लवकरच आम्हाला भेटतील. आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार आहेत,' सध्या लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार आपल्यासोबत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र अद्याप ६ खासदार हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याच्या बाजूने असल्याचं समजते. आता या ६ खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ओबीसी आरक्षणासंदर्भात दिल्लीला गेले आहेत. त्यांनी सांगितले की, 'ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. त्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मी दिल्लीत आलो आहे. राज्यातील ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आता याबाबतीत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येईल.'

दरम्यान, काल शिंदे गटाची ऑनलाइन बैठक झाली. यावेळी शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी उपस्थिती लावली होती. तसंच जवळपास अर्धा तासा झालेल्या या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत चर्चा झाल्याचं समजते. यात राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्या नावांवर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. नवीन गट स्थापन करण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू असून त्याबाबत चर्चेसाठीच एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले असल्याचं म्हटलं जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या