मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Eknath Shinde : पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले.. ‘त्यानंतर मी…’

CM Eknath Shinde : पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले.. ‘त्यानंतर मी…’

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 11:11 AM IST

CM Eknath Shinde On Sharad Pawar Inquiry : शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ असलेले खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या ताब्यात असन ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात शरद पवार यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे खासदार अतुल भातखळकर यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार

मुंबई : राज्यात पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या नंतर आता या घोटाळ्यात थेट राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले जात आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी शरद पवार यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी या घोटाळ्या प्रकरणी शरद पवार यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना यशवंतराव बळवंतराव चव्हाण सेंटर येथे म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्रा चाळ संदर्भात बैठका झाल्या असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखही या बैठकींना उपस्थित असल्याचे बोलले जात आहेत. भातखळकर यांच्या मागणीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात विचारले असता त्यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला. मंगळवारी रात्री जळगावच्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रकारांनी हा प्रश्न विचारला.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,” असे ते म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दलही प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, मी त्या बाबतीत माहिती घेऊन नक्कीच आपण सविस्तर बोलू,” असे उत्तर त्यांनी दिले.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या