मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : कट्टपा ते प्रायव्हेट कंपनी... या मुद्यांनी एकनाथ शिंदेंनी केला उद्धव ठाकरेंवर प्रहार ; वाचा सविस्तर प्रमुख १० मुद्दे

Eknath Shinde : कट्टपा ते प्रायव्हेट कंपनी... या मुद्यांनी एकनाथ शिंदेंनी केला उद्धव ठाकरेंवर प्रहार ; वाचा सविस्तर प्रमुख १० मुद्दे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 06, 2022 12:43 AM IST

Dasara Melava : राज्यात आज दसरा मेळाव्या निमित राजकीय फटकेबाजी पहायला मिळाली. शिवसेनेतील फूटीमुळे आज मुंबईत दोन दसरा मेळावे साजरे झाले. या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शब्दबाणांतून एकमेकांवर चांगलेच वार केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर दिले आहे. शिंदे यांनी हिंदुत्व, काँग्रेस, राष्ट्रवादीशी केलेला संग, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली अशा अनेक मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

१. मुख्यमंत्री कंत्राटी आहे असा आरोप उद्धव ठाकरे करतात. हो एकनाथ शिंदे हा कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या समोर साक्षीने मी कंत्राटी मुख्यमंत्री असल्याचे मान्य करतो. हो या राज्याच्या सर्वांगीण विकासाचा कंत्राट मी घेतलेला आहे. या राज्यातल्या कष्टकरी शेतकरी वारकरी सगळ्यांना न्याय देण्याचं कंत्राट घेतलंय. माझ्या माय भगिनी महिलांचा उत्कर्ष करण्याचा कंत्राट मी घेतले आहे. या राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं कंत्राट मी घेतलं आणि म्हणून या राज्याचा या राज्याचे कंत्राट हे राज्यात हे सरकार योग्य कंत्राटदाराच्या हाती गेले. त्यामुळे तुम्ही टेंशन फ्री रहा. तुम्ही तुमची काळजी करा आमची नको.

२. उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण तो स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

३. उद्धव ठाकरे यांनी भाषणात माझ्या नातवावर टीका केली. पण त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करायची, काय टीका करायची हे समजत नाही. पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या. आमचे कोथळे काढणार असं ते म्हणाले, आयुष्यात यांनी कुणाला एक चापट तरी मारलीय का?"

४. पीएफआयवर ज्या वेळी कारवाई झाली त्यावेळी तुम्ही एकही शब्द उच्चारला नाही. केंद्र सरकार आणि अमित शहांनी घेतलेला हा निर्णय योग्यच होता. राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल. या राज्याविरोधात कारवाया खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड दम देखील त्यांनी दिला.

५. वारसा हा विचारांचा असतो. तो जपायचा असतो. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जिवापाड जपला आहे. त्यामुळे विचारांचे पाईक आणि शिलेदार कोण आहे? हे महाराष्ट्राला समजले आहे. आम्हाला दोन महिन्यापासून गद्दार आणि खोके तिसरा शब्दच नाही...बाकी तर बोला... पण काय केलं नाही तर बोलणार काय? त्यामुळे होय.. गद्दारी झाली आहे. शंभर टक्के बरोबर आहे. पण गद्दारी झाली.. ती 2019 ला गद्दारी झाली. ज्या निवडणुका आपण लढवल्या त्यानंतर जी आघाडी केली. त्याचवेळी गद्दारी झाली. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली. हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली. या राज्याच्या मतदाराशी गद्दारी केली, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

६. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही बेईमानी केली आहे. तुम्ही विश्वासघात केलाय. तुम्ही गद्दारी केली. आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय. आम्ही केलेली गद्दारी नाही.. तर गदर आहे... गदर म्हणजे क्रांती, उठाव होय.. महाराष्ट्रातील जनतेनं जाणलेलं आहे. त्यामुळे आम्ही गद्दार नाही, बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. हे आम्ही अभिमानाने आणि छातीठोकपणे सांगतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाली आहे. तुम्ही तर बापाचे विचार विकले. तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला.

७. ज्यावेळी अडीच वर्षाचं सरकार बनत होतं, तेव्हाच आमच्या आमदारांनी ही आघाडी चुकीची असल्याचे सांगितली.ही आघाडी महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारी असली तरी ती आम्ही मान्य केली, पण जेव्हा बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि विचार गुंडाळून टाकले. तेव्हा मात्र आम्हाला भूमिका घ्यावी लागली.

८. देशविघातक कारवाया करणाऱ्या पीएफआय संघटनेवर नरेंद्र मोदी यांनी बंदी घातली तेव्हा एकाही शब्दाने तुम्हाला बोलता आलं नाही. उलट या संघटनेवर बंदी घातल्यावर आरएसएसवर देखील बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाही, ज्या ज्या वेळी देशात संकटे आली त्या त्या वेळी आरएसएसही संघटना मदतीसाठी पुढे राहिली. राष्ट्रबांधणीत या संघटनेचा मोठा वाटा आहे. या संघटनेची तुलना तुम्ही पीएफआयशी करता? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रावादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसवर हल्ला केला.

९. बाळासाहेबांनी पवार साहेबांचे दोस्ती होती पण राजकारणामध्ये बाळासाहेबांनी कधी दोस्ती नाही आणली. सत्तेसाठी कधी पवारांची हात मिळवणी केली नाही. त्यांच्याबरोबर युती केली तर लोकांना काय तोंड दाखवायचं असे त्यांच म्हणणे होते. पण तुम्ही आपला नैसर्गिक मित्राला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची युती करताना तुमच्या सोबत आमची फरपट केली. वैचारिक दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आपण विरोधक पण त्यांच्या गळ्यात गळा तुम्ही घातला आणि ही मंडळी जेव्हा आपला गळा कापायला निघाली तेव्हाही तुमचे डोळे उघडले नाही. आघाडीतील पक्ष आघाडी धर्म पाळत नव्हते शिवसेनेचे खच्चीकरण होत होतं. पक्ष नेतृत्व मात्र ध्रूतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये 'संजय' जेवढं आणि जे सांगेल तेवढेच ऐकत होते. त्यामुळेच हे महाभारत घडलं.

१०. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्या सोबत आहे. ही परंपरा मोडीत तुम्ही काढली. हिंदुत्वाच्या विचारांना बगल तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या भूमिकेला त्यांच्या विचाराला मूठमाती दिली. त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग मला तुम्ही सांगा तुम्हाला त्या जागेवर उभे राहण्याचा तरी नैतिक अधिकार उरतो का ? बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का ? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो फायद्यासाठी महत्त्वकांक्षासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण का टाकला? बाळासाहेब रिमोट कंट्रोल ने सरकार चालवायचे तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हाला आणि त्याच बरोबर बाळासाहेबांच्या विचाराला देखील दावणीला बांधले, असा आरोप शिंदे यांनी केला.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग