मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजारांचा बोनस, विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या १० महत्वपूर्ण घोषणा

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजारांचा बोनस, विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या १० महत्वपूर्ण घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 29, 2022 06:40 PM IST

Nagpur winter assembly session : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत महत्वपूर्ण घोषणा करताना विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजारांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर विदर्भ विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी १० महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी तसेच विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाचा पाच लाखांहून अधिक धान उत्पादन शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत थेट हस्तांतरित केली जाणार आहे. 

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भाचा विकास होणे महत्वाचा आहे.  समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबईमधील अंतर कमी झाले आहे. समृध्दी महामार्गामुळे सगळ्यांची समृध्दी झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी केलेल्या महत्वाच्या घोषणा –

 

  1. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर.
  2. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ला सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे.
  3. वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे.
  4. गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून, पीपीपी तत्वावर काम करण्यात येईल.
  5. गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होणार.
  6. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७५५ कोटी रुपये निधी वितरित.
  7. अमरावती, नागपूर पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.
  8. विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटीच्या  रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण ४४ हजार १२३ कोटी रुपयांची गुंतवणूक. ४५ हजार रोजगार निर्मिती होणार.
  9. विदर्भातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु आहेत. लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.बुलढाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.

IPL_Entry_Point