मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं, खेडमधून मुख्यमंत्री कडाडले!

Eknath Shinde : सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं, खेडमधून मुख्यमंत्री कडाडले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 08:04 PM IST

Eknath Shinde Khed Rally Live : रत्नागिरीच्या खेडमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri Live Updates
Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri Live Updates (HT)

Eknath Shinde Rally In Khed Ratnagiri Live Updates : काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना पराभूत करण्याचा निर्धार ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा घेतली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार टीका करत खेडमधून योगेश कदम हेच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

खेडमधील सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील काही लोक आमची आजची सभा पाहत असतील. यापूर्वी येथे एक सभा झाली. परंतु त्या सभेशी आमच्या सभेची तुलना करायला मी आलेलो नाही. गेल्या आठवड्यात एक फुसका बार खेडमध्ये येऊन गेला. त्यांच्या आदळआपट, थयथयाट किंवा टीकेला आम्ही काय उत्तर देणार?, मुंबईतही अशीच आदळआपट सुरू आहे. फक्त जागा बदललेली आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शिवसेनेत आम्ही उठाव केल्यानंतर आनंदराव अडसूळ, गजानन किर्तीकर यांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळं आता आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या विकासासाठी काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जागोजागी सर्कशी प्रमाणे शो होणार आहेत. तिथेही तेच टोमणे, खोके आणि गद्दार या शब्दांव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाहीये, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मतदारांनी शिवसेना-भाजपा युतीला मतदान केलं होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शिवसेनेवरील तोच डाग आम्ही पुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्याला दिलंय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी तडजोड केली- मुख्यमंत्री

सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी एका मिनिटांत तडजोड करत शिवसेनेचं नाव घालवण्याचं काम केलं. हिंदुत्वाचं राजकारण केल्याची चूक उद्धव ठाकरेंनी विधानसभेत कबूल केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनाच चुकीचं ठरवलं. ज्या लोकांचा संबंध अतिरेक्यांशी आहे, त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळात कसे काय बसू शकता?, राहुल गांधी हे सावरकरांविषयी नेहमी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यावर उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले. हे कसलं हिंदुत्व आहे?, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

WhatsApp channel