मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Atal Setu : मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचे अंतर आता अवघ्या २० मिनिटांत होणार पार!

Atal Setu : मुंबई ते नवी मुंबई दोन तासांचे अंतर आता अवघ्या २० मिनिटांत होणार पार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 06, 2024 07:01 PM IST

Atal Setu : अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांमध्ये अटल सेतूच्या कामाची पाहणी
मुख्यमंत्र्यांमध्ये अटल सेतूच्या कामाची पाहणी

देशातील सर्वाधिक म्हणजे २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंकवरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ या प्रकल्पाचे उदघाटन १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ६ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अटल सेतूची ठिकठिकाणी जाऊन पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथ इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवीमुंबईत अवघ्या २० मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. 

हा सेतू मार्ग मुंबई- गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी ५०० स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे.

अटल सेतूची वैशिष्ट्ये –

  • मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना
  • ५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.
  • शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर.
  • भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च.
  • सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.
  • मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.
  • महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला.

WhatsApp channel