मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : चौफेर टीकेनंतर फाईव्ह स्टार हॉटेल सोडलं, मुख्यमंत्र्यांचा शासकीय विश्रामगृहात मुक्काम

Eknath Shinde : चौफेर टीकेनंतर फाईव्ह स्टार हॉटेल सोडलं, मुख्यमंत्र्यांचा शासकीय विश्रामगृहात मुक्काम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 16, 2023 06:33 AM IST

Marathwada Cabinet Meeting : शिंदे-फडणवीस सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ औरंगाबादेत दाखल झालं आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.

CM  Eknath shinde in aurangabad for Marathwada Cabinet Meeting
CM Eknath shinde in aurangabad for Marathwada Cabinet Meeting (Hindustan Times)

Marathwada Cabinet Meeting : मराठवाड्याची राजधानी औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पंचतारांकित हॉटेल सोडून शासकीय विश्रामगृहात मुक्काम केल्याची माहिती समोर येत आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाचं नियोजन असताना मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी एका झटक्यात निर्णय बदलत मुक्काम हलवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ मुंबईहून मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये हलवलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये कॅबिनेट बैठक होणार असून त्यात विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कॅबिनेट मिटिंगसाठी शिंदे-फडणवीस सरकार औरंगाबादेत दाखल झालं आहे. परंतु सचिव, अधिकारी आणि मंत्र्यांच्या राहण्याची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सर्व मंत्री शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलेले आहे. त्यामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामा इंटरनॅशनल हॉटेलच्या आलिशान सूटमध्ये राहणार होते. परंतु त्यांनी अचानक निर्णय बदलत शासकीय विश्रामगृहात मुक्काम ठोकला आहे.

औरंगाबादेतील फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचं भाडं तब्बल ३२ हजार रुपये इतकं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी सूट बुक करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील ताज हॉटेलमध्येही काही मंत्री थांबणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी ४० ते ४५ रुम बुक करण्यात आल्या आहे. अमरप्रित हॉटेलमध्ये तब्बल ७० रुम बुक करण्यात आल्या आहे. नम्रता कॅटर्स या कंपनीला जेवणाचं कंत्राट देण्यात आलं असून जेवणाच्या थाळीची किंमत दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी ३०० गाड्यांची बुकिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

IPL_Entry_Point