राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणूक आयोग व पोलीस यंत्रणाही डोळ्यात तेल घालून सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जात आहे. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची वणी व औसा येथे झडती घेतल्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओ शूट करत संताप व्यक्त केला होता.
ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही बॅगा तपासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओही मला पाठवा,असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती, त्यानंतर आज निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री शिंदे व अजित पवारांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री शिंदे हे आज पालघरमध्ये आले आहेत. महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेसाठीशिंदे येथेआले आहेत. शहरातीलकोलवडे पोलीस परेड मैदानावरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरल्यानंतर त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडील बॅगांची तपासणी केली. अधिकारी बॅगांची झडती घेत असतानाच, मुख्यमंत्री शिंदेंनी माझ्याकडे काही पैसे नाहीत, फक्त कपडे आहेत, असे त्या अधिकाऱ्यांना सांगितले. युरीन पॉट मात्र नाही, असा टोलाही शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.
इलेक्शन कमिशन त्यांचं काम करतय. त्यांच्यावर राग कशाला काढता, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बॅगांची तपासणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आता निवडणूक आयोगाचे नियम आहेत. त्याप्रमाणे त्यांनी बॅग तपासणी केली. त्यांचे कर्तव्य त्यांनी केले. माझ्या बॅगमध्ये पैसै नाहीत, दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत. युरीन पॉट नाहीत, असं ते म्हणाले.
बॅगा तपासल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यांची काय चूक आहे. ते कर्मचारी आहेत. त्यांच्यावर काय राग काढायचा. महायुतीच्या कामाच्या धडाक्यामुळं,जे वातावरण लाडक्या बहिणींनी निर्माण केले आहे; त्यामुळे हे बिथरले आहेत. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.