गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक महाआघाडीच्या कार्यालयात शिरले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक महाआघाडीच्या कार्यालयात शिरले!

गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, गाडीतून उतरले अन् तडक महाआघाडीच्या कार्यालयात शिरले!

Nov 12, 2024 05:29 PM IST

Eknath Shinde : नसीम खाम यांच्या कार्यालयासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री तडक काँग्रेसच्या कार्यालयात गेले
मुख्यमंत्री तडक काँग्रेसच्या कार्यालयात गेले

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष दिवसेंदिवस कमालीचा तीव्र होतानात दिसत आहे. याचे प्रत्यय सोमवारी मुंबईतील चांदिवली परिसरात आला. साकीनाका येथील सभा संपवून जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांचा ताफा संतोष कटके नावाच्या तरुणानं अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. या तरुणाने मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरून त्यांच्या कारवर फटकाही मारला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला आणि स्वत: गाडीतून खाली उतरले व तरुणावर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस नेते नसिम खान यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चांदिवली परिसरातून सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'गद्दार, गद्दार'च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला व ते गाडीतून खाली उतरले.

नेमकं काय घडलं?

अपशब्द वापरल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार समोर आला. अनेकांनी याचा व्हिडिओ बनवला.  त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतोष कटके या तरुणाने सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. गद्दार घोषणा ऐकून मुख्यमंत्री शिंदे चांगलेच संतापले. त्यानंतर ते गाडीतून रागातच खाली उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, 'आपल्या कार्यकर्त्यांना असे शिकवता का?', अशा शब्दांत जाब विचारला. यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र,  नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

संतोष कटकेचा ठाकरे गटात प्रवेश -

सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्यानंतर चर्चेत आलेल्या संतोष कटके या तरुणाने मंगळवारी  सकाळीच मातोश्री गाठली. यावेळी संतोष काटके यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी संतोष काटके यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी विचारलं की, 'काल कोण होतं शाखेत त्यांनी समोर या'. त्यावर कार्यकर्त्यांनी संतोष कटकेला पुढे केले. उद्धव ठाकरेंनी कटकेचे कौतुक केले.

Whats_app_banner