
Eid E Milad Holiday : अनंत चतुर्दशी दिनी सार्वजनिक गणपतींचं होणारं विसर्जन आणि ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी, गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी असल्यानं मुंबईत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणुकांचं व्यवस्थापन व गर्दीचं नियोजन करणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून राज्य सरकारनं शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी ईदची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
अनंत चतुर्थीला गणपती विसर्जनाच्या मिरवणुका असतात, तर ईद ए मिलादच्या दिवशी मुस्लिम बांधवही मिरवणुका काढतात. हे दोन्ही सण आज एकाच दिवशी आहेत. हे लक्षात घेऊन ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. राज्यात शांततेचं वातावरण असावं. पोलिसांना गर्दी व मिरवणुकांचं नियोजन करता यावं म्हणून ईदची सुट्टी २९ तारखेला जाहीर करण्याची विनंती शिष्टमंडळानं केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती मान्य केली आहे. त्यामुळं मुंबईतील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून पोलिसांचाही ताण हलका होणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, रईस खान, नसीम खान यांचा समावेश होता.
अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला निरोप देताना सर्वांनी शिस्त पाळावी. शांततेत व आनंदात बाप्पाचं विसर्जन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गणेशभक्तांना केलं आहे.
गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनानं सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. पुढच्या काळातही ईद, नवरात्र आणि दसरा-दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्यानं आणि भक्तिभावानं हे सण साजरे करावेत आणि राज्याची परंपरा अधिक उज्ज्वल करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशी सदिच्छा व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचं जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर व प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
