Eknath Shinde On Uddhav Thackeray : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवरील वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचले होते. त्यानंतर आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का?, असा सवाल करत ठाकरेंवर कुरघोडी केली आहे. त्यामुळं आता सावरकरांच्या मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या कानशिलात लगावली होती. आता उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार आहेत का?, सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, त्यांच्या संघर्षामुळंच देश स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. परंतु त्याचा काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपमान केला जात आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत आहे. त्यामुळं हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणाऱ्या एकाही नेत्यानं विधानसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणला आहे.
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं म्हणणारे अनेक नेते विधानसभेच्या अधिवेशनात मूग गिळून गप्प होते. कशासाठी तर राजकारण आणि महाविकास आघाडीसाठी?, उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार आहे?, हे त्यांनी स्पष्ट करायला हवं, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींची सावरकर होण्याची लायकी नाही- मुख्यमंत्री
ते सावरकर नाहीत, असं राहुल गांधी वारंवार सांगत आहे, सावरकर होण्याची त्यांची लायकी देखील नाही. राहुल गांधी यांच्यात सावरकरांचा त्याग नाहीये, त्यामुळं ते काय सावरकर होणारेत?, परदेशात जाता आणि तिथं देशाची निंदा करता, यापेक्षा दुर्दैवं काय आहे?, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
संबंधित बातम्या