मागील निवडणुकीत आम्ही शिवसेना भाजप युतीसाठी लोकांकडे मते मागितली होती. मात्र सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खोटं बोलून शिवसेना-भाजपा युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी गाठ बांधली होती. सत्ता मिळाल्यावर तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच त्यावेळी जर मी वेगळा निर्णय घेतला नसता तर आता शिवसेना दिसली नसती, असाही दावा केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'शिवसंकल्प अभियाना' तील पहिला मेळावा आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरू नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मला कोणत्याही पदाचा मोह नसून पक्ष वाचवण्यासाठी मी वेगळी भूमिका घेतली. शिवसेना, धनुष्यबाण, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी निर्णय घेतला. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला. आम्ही धाडस केले नसते तर शिवसेना दिसली नसती.
हे जगातील अनेक देशातील लोकांनी पहिले आहे ते करण्यासाठी धाडस आणि वाघाचे काळीज लागले, पुढे काय होईल याची पर्वा केली नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री पदाचा वापर,सत्तेचा वापर झाला पाहिजे. प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी भावना आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, युती म्हणून आम्ही मते मागितली,सर्वसामान्य लोकांनी युती म्हणून मतदान केले होते. पण, निकाल आल्यानंतर काही लोकांनी सर्व दरवाजे उघडे आहेत म्हणत काँग्रेसला डोक्यावर घेतले. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला विश्वास फोल ठरला. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले,अन्याय होऊ लागला.
मुख्यमंत्री म्हणाले, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीच्या जागा निवडून आणल्या पाहिजेत. विरोधकांकडे विरोध करण्यासाठी काहीच शिल्लक उरले नाही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आम्ही काही बोललो तर त्यांना पाळता भुई कमी होईल. खोट बोलून शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. कोविड काळात मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्ही काय केले हे आम्हाला शिकवू नये, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
संबंधित बातम्या