मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath shinde : “मोठा राजकीय भूकंप होणार अन् विरोधी पक्ष...”, मोदींसमोरच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Eknath shinde : “मोठा राजकीय भूकंप होणार अन् विरोधी पक्ष...”, मोदींसमोरच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 12, 2024 07:05 PM IST

Eknath Shinde on Opposition : लोकसभा निवडणुकीमध्ये भूकंप येणार असून आमचे विरोधक ते सहन करणार नाही, असं भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Eknath Shinde on Opposition
Eknath Shinde on Opposition

अटल सेतू हा २२ किलोमीटरचा सी ब्रीज आजपासून सुरु झाला आहे. याचे भूमिपूजन मोदींनीच केले होते व याचे उद्घाटनही मोदींच्याच हस्ते होत आहे. शिवडी-न्हावाशेवा सेतूला अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे. हा सेतू नावाप्रमाणेच अटल आहे. अटल सागरी सेतू भूकंपातही सुरक्षित राहील, इतका मजबूत आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर येणारा भूकंप विरोधक सहन करू शकणार नाहीत, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना लगावला.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. यामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भूकंप येणार असून आमचे विरोधक ते सहन करणार नाही, असं भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

शिंदेयांनी म्हटले की, ५० वर्षात जे झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मोदींनी देशाची अर्थ व्यवस्था मजबूत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला देशात आणि राज्यात मोठे यश मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींनी देशात जितकं प्रेम मिळत आहे, तितके याआधी कुणालाच मिळालं नाही. हेच विरोधकांना खटकतं, त्यांच्या पोटात दुखतं. अबकी बार ४०० पार हा नारा मजबूत करायचा आहे. 'अबकी बार मोदी सरकार आणि राज्यात अबकी बार ४५ पार...' अशी घोषणाही त्यांनी मोदींसमोरच दिली.

WhatsApp channel