मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Cm Eknath Shinde Appeal To Farmers Regarding Sowing After Pre Kharif Review Meeting

Eknath Shinde : 'यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये'

Farmers
Farmers
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
May 24, 2023 07:59 PM IST

CM Shinde in Pre Kharif Review meeting : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

Pre Kharif Review meeting : 'यंदाच्या मान्सूनवर एल- निनोचा प्रभाव असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 'मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यावेळी प्रत्यक्ष शेतात जावून शेतकऱ्यांशी संवाद साधता आला. त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी खरीप हंगामाची उत्तम पूर्व तयारी झाली आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागानं गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. लिंकेजच्या तक्रारी आल्या, तर तातडीनं कारवाई करावी. शेतकऱ्यांसाठी पुरेसं बी-बियाणं, खतांचा साठा उपलब्ध असून ते वेळेत मिळतील, अशी दक्षता कृषी विभागानं घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

'यंदाच्या मान्सूनवर एल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरण्यांचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावं. राज्य शासनाच्या माध्यमातून पुरविण्यात येणारं बियाणं दर्जेदार असावं. त्याचीही आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसाय, कृषी पर्यटनावर भर द्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

WhatsApp channel