सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यातच कोसळल्याने जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. सर्वच स्तरातून पुतळ्याच्या बांधकामाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी या मुद्द्यांवरून रस्त्यावर उतरून आंदोलन करत सरकारला घेरले आहे. या घटनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात माफी मागितल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराज पुतळ्याप्रकरणी माफी मागितली आहे. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे. त्यांचा पुतळा कोसळल्यामुळे लोकभावना तीव्र आहेत. मात्र यावर विरोधकांनी राजकारण करू नये. सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांचा त्याच ठिकाणी मोठा पुतळा कसा उभा राहील, यासाठी सहकार्य करावे.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांची माफी मागायला, त्यांच्या चरणावर मी एकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवून नतमस्तक व्हायला तयार आहे. महाराजांची १०० वेळा माफी मागायला मला कमीपणा वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो. शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण न करता शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,
छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनीही सद्बुद्धी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचठिकाणी पुन्हा रुबाबदार पुतळा उभारण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या विरोधकांनी सांगितल्या पाहिजेत. सहकार्य केले पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला पण ही दु:खद घटना घडलेली आहे. या घटनेचं राजकारण करणे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. राजकारण करायला इतर मुद्दे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपली श्रद्धा, दैवत आहे यावर राजकारण करू नये असं त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याबाबत काल महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेव्हीचे अधिकारी आणि राज्याचे काही अधिकारी होते. त्यात २ संयुक्त समितींची स्थापना केली असून एक समिती दुर्घटना कशी झाली त्याची चौकशी आणि कारवाई करेल. दुसरी समिती ज्यात तज्ज्ञ, शिल्पकार, आयआयटी, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा करण्यात येथील.
या समितीत असे शिल्पकार आहेत, ज्यांनी महाराजांचे याआधी पुतळे तयार केले आहेत. त्यायाबाबतीत अनुभव आहे. अशा अनेक शिल्पकारांना आम्ही बैठकीला बोलावले होते. त्याचबरोबर मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील संपूर्ण परिसर संरक्षित करावा, अशी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. ते पुन्हा पुतळा पुन्हा उभा करण्यास कटिबद्ध आहेत.