Ganeshotsav 2024 : गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात टोलमाफीची घोषणा, कुठे मिळणार फ्री पास?-cm eknath shinde announces toll exemtion for ganesh devotees during ganeshotsav 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav 2024 : गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात टोलमाफीची घोषणा, कुठे मिळणार फ्री पास?

Ganeshotsav 2024 : गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात टोलमाफीची घोषणा, कुठे मिळणार फ्री पास?

Sep 04, 2024 11:12 PM IST

Ganeshotsav 2024 : राज्यातील गणेश भक्तांसाठी खुशखबर असून उद्यापासून म्हणजेच ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारकडून सर्व गणेश भक्तांना टोल माफीची घोषणा करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात टोलमाफीची घोषणा
गणेशोत्सव काळात टोलमाफीची घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर आहे. गणेशोत्सव काळात टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत टोलमाफी मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यावर ही सवलत असणार आहे.

मुंबई-पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी १४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

कुठे मिळणार फ्रि पास –

गणेशोत्सवासाठी राज्यातील विविध भागातील गणेश भक्त कोकणात आपल्या गावी जातात. यादरम्यान हजारो प्रवाशांना टोल भरावा लागतो. मात्र सरकारच्या निर्णयाने हजारो गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. गणेशभक्तांना उद्यापासूनच टोलमाफी दिली आहे. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेस देखील टोल नाक्यावर मोफत सोडल्या जाणार आहेत. टोलमाफी सवलत मिलवण्यासाठी फ्री पास घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

सरकारच्या टोलमाफी सवलतीसाठी वाहनांवर  ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’  अशा आशयाचे स्टीकर्स असणारे टोल माफी पास दर्शनी भागावर लावालेत. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन देण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

हाच पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पास काढण्याची गरज नाही. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस कोकणात जातील, त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.