मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी भाजपची मध्यस्थी; दिपाली सय्यद यांचे ट्विट

CM शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी भाजपची मध्यस्थी; दिपाली सय्यद यांचे ट्विट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 17, 2022 07:58 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची दोन दिवसात भेट होणार असे संकेत दिपाली सय्यद यांनी ट्विटमधून दिले आहेत. तसंच त्यांनी भाजपचे आभारही मानले आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (फोटो - पीटीआय)

शिवसेनेत बंडखोरी करत ५० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केलं. यामुळे गेल्या महिन्यात राज्यात मोठी उलथापालथ बघायला मिळाला. दरम्यान, थेट आव्हान देत खरी शिवसेना आमचीच असं म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंना भेटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलेल्या एका ट्विटची चर्चा सध्या होत आहे. 

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटलं की,"येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्थीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल."

दिपाली सय्यद यांचे याआधीचेही ट्विट चर्चेत आहे. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे हे मंत्रिमडळात दिसावेत असं म्हटलं होतं. दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, "लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे. आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसून हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भेट व्हावी यासाठी दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याआधी त्यांनी एक ट्विटही केलं होतं."उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावतीने प्रवक्ते आणि आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपाने मोठ्या मनाने मध्यस्थी करावी." असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं होतं.

IPL_Entry_Point