प्रत्येक बसस्थानकात महिला बचतगट, दिव्यांग आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रत्येक बसस्थानकात महिला बचतगट, दिव्यांग आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल, मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रत्येक बसस्थानकात महिला बचतगट, दिव्यांग आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published Nov 22, 2023 10:42 PM IST

Stalls For womens st Bus Stand : राज्यातील बसस्थानकांवर १०टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध,दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल तसेच महिला बचत गटांना प्रत्येक बसस्टँडवर एक स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Stalls For womens st Bus Stand
Stalls For womens st Bus Stand

राज्यातील प्रत्येक बसस्टँडवर महिला बचत गटासाठी काही स्टॉल आरक्षित करणे तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Apala Davakhana) सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले आहेत.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बसस्थानाके स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यांचा चेहरामोहरा बदलावा, अशा सूचनाही शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीपार पडली.एसटी महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यातील बसस्थानकांवर १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध,दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महामंडळाला २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे या परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.

यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी  मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर