शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक' टीका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक' टीका

शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक' टीका

Feb 02, 2025 09:46 AM IST

Sanjay Raut on Eknath shinde : खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोख ठोक सदरातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून यामुळे राज्य अस्थिर असल्याची टीका त्यांनी केली आहे.

शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक' टीका
शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक' टीका

Sanjay Raut on Eknath shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून सरकारवर गंभीर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून सरकारकडे मोठे बहुमत असतांना देखील राज्यात अस्थितरटा आहे असा दावा त्यांनी केला आहे. या बाबत शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांना माहिती दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित झाल्याचं समजत असून ते या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. दोघांमध्ये फारसे चांगले संबंध राहिले नाहीत असे राऊत यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी अजित पवार यांना हुशार म्हटलं आहे. त्यांना काहीच हवं नसल्यानं त्यांनी ईडीच्या चौकशी पासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्र गटांना मोठे बहुमत मिळूनही राज्य पुढे जाताना दिसत नाही. याचे कारण मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातला विसंवाद हा आहे. पुन्हा मुख्यमंत्री केले नाही या धक्क्यात शिंदे अजून सावरले नाहीत. ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिंदे यांचा हा डाव फडणवीस ओळखून आहेत.

शिंदे फडणवीस यांच्यातील संबंध चांगले नाहीत

आपले 'लाडके' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे चांगले संबंध राहिले नाहीत. याचा अनुभव रोज येतो आहे. भाजप कोट्यातील मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या ठाणे जिल्हयात नियमित जनता दरबार घेणार असे जाहीर करून 'कहर' केला आहे. त्यामुळे नवी वादाची ठिणगी पडली आहे. यावर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून तसे असेल तर आम्ही नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्हयात जाऊन दरबार भरवू. यांच्या भांडणात नुकसान मात्र सामान्य नागरिकांचे होत आहे. त्याची फिकीर कुणाला नाही. शिंदे गटाचे एक आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन आणखी गोंधळ वाढवला आहे. "शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. राऊत यांनी दोघांमधील संवाद देखील लेखात लिहिला आहे.

 

संजय राऊत :  मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेले नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय?"

आमदार : ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत.

संजय राऊत : शिंदे यांना धक्का बसला आहे काय?

आमदार : ते मनाने कोलमडले आहेत.

संजय राऊत : का? काय झालं?"

 

आमदार : निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व २०२४ नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते.

फोन टॅप होत असल्याचा संशय

शिंदे व त्यांच्या लोकांना त्यांचे फोन टॅप केले जात आहेत असे शिंदे यांना वाटत आहे. दिल्लीच्या एजन्सी त्यांच्यावर पाळत ठेवून असा देखील संशय शिंदे यांनाआहे. शिंदे यांची पुरती कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारीत नाहीत या दुःखात शिंदे बुडाले आहेत. फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दुःखाचा कडेलोट झाला की, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाप्टरने साताऱयातील दरेगाव गाठतात व डोके थोडे शांत झाले की, ठाण्याला परत येतात, पण डोके शांत झाले तरी त्यांचे मनःस्वास्थ्य सुधारत नाही, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांची स्थिती बरी

संजय राऊत यांनी अजित पवार यांची स्थिती शिंदे यांच्या पेक्षा बारी असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या असून त्यामुळे त्यांना काहीही नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी फडणवीस यांच्याशी त्यांचे नाते अधिक मजबूत केले आहे. तसेच ईडीचा चौकशीचा फेरा देखील त्यांनी टाळला आहे. या सोबतच धनंजय मुंडे यांचा देखल ते बचाव करण्यात यशस्वी होतांना दिसत आहे. अजित पवारांना अमित शहांच्या यादीतले जंटलमेन व्हायचे असून एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा 'बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद त्यांनी मिळवले. या व्यवहारात अजित पवार खूश आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही व मुख्यमंत्री होण्यापेक्षा सुरक्षित बाहेर राहिलेले बरे हे धोरण पवारांनी स्वीकारले. पण शिंदे यांची अवस्था बिकट आहे. ठाकरे मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते व फडणवीस मंत्रिमंडळात असतानाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचे आहे. हा धोका फडणवीस यांनी ओळखला आहे. शिंदे यांच्या सोबत असलेले किमान २१ आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात व फडणवीस यांच्या सूचनेनुसारच ते सुरतला गेले हे सत्य शिंदेही जाणतात. त्यामुळे शिंदे गट आजही एकसंध नाही. शिंदे हे स्वतःच डळमळीत झाल्याचे स्पष्ट जाणवते व समोर येऊन लढण्याचे बळ त्यांच्यात अजिबात नाही. शिंदे यांना सध्या अमित शहांचे पाठबळ आहे. ते वरवरचे व कामापुरते आहे. ते नसेल तेव्हा शिंदे यांचे नेतृत्व संपलेले असेल, असे राऊत यांनी रोख ठोक मध्ये लिहिलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या