लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत राज्यातील १० हजार पात्र महिलाना "पिंक ई रिक्षा" योजनेचा लाभ देण्यात आला. रविवारी (२० एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्यात आले. या योजनेची नागपूरात सुरुवात झाली असून राज्यातील एकूण ८ जिल्ह्यात १० हजार पिंक ई-रिक्षांचे वाटप केले जात आहे.
नागपूरसोबतच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि अमरावती या आठ जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पिंक रिक्षाच्या एकूण किमती पैकी २० टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे. तर उर्वरित ७०टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने पिंक ई-रिक्षा या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच कामकाजी महिलांना या महिलांच्या ऑटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या योजनेने दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील ५० पात्र लाभार्थी महिलांना ई-रिक्षा वितरित झाल्या असून जिल्ह्यात २ हजार महिलांना या योजनेअंतर्गत ई-रिक्षा वितरीत होवून रोजगार उपलब्ध होणार आहे.
नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिडरसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान करार झाला आहे. यातून पिंक ई-रिक्षाधारक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा ही योजना आणली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर जिल्ह्यातील ५० पात्र महिला लाभार्थ्यांना ई -रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे. या महिलांना किमान दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाच वर्षांचा रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्था ही त्यांना करून देण्यात आली आहे. महामेट्रो सोबत करार करून फिडर सेवेअंतर्गत या महिलांच्या ई-रिक्षाची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगारही मिळणार आहे. येत्या काळात विमानतळ, पर्यटनस्थळ अशा ठिकाणीही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही महत्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्यांकरीता राबविण्यात येणार आहे. यात नागपूर जिह्यामध्ये २००० महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे.
या योजनेंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या