महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Dec 06, 2024 11:37 PM IST

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने आम्हाला लोकसभेत खुलेपणाने पाठिंबा दिला. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. त्यांचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे.

राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस

निकालानंतर १२ दिवसांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथ दिली जाणार आहे. दरम्यान आता राज ठाकरे महायुती सरकारमध्ये सामील होणार का, याबाबत देवेंद्र फडणवीसांना मोठं विधान केलं आहे.

निवडणुकीच्या काळात राज ठाकरे आपण सरकारमध्ये असणार असे म्हणत होते. मात्र त्यांच्या पक्षाचा यंदा एकही आमदार विधानभवनात पोहोचू शकला नाही. विधानसभा निवडणूक राज ठाकरेंनी कोणत्याही युती किंवा आघाडीत सामील न होता स्वबळावर लढली होती. त्यांचा गेल्यावेळी असणारा एकटा आमदारही पराभूत झाला. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह सर्व उमेदवार पराभूत झाले. या पराभवानंतर मनसे पक्षाच्या मान्यतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. विधानसभेनंतर सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने आम्हाला लोकसभेत खुलेपणाने पाठिंबा दिला. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. विधानसभेला आमच्या लक्षात आले की, महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? त्याचबरोबर आम्ही तीन पक्ष असल्याने आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले. पण त्यांना मते चांगली मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मते घेतली आहेत. मला वाटते की, त्यांचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दरम्यान महायुतीच्या शपथविधीनंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन व कौतुक केले होते. माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली,याबद्दल त्यांचे अभिनंदन. २०१९ ला खरेतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडले त्यामुळे ती संधी हुकली. असो,पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे,त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकत आहे, लोकांना गृहीत धरत आहे,असे जर जाणवले, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसले तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसेच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा!, अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी केली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या