Budget Session : आदित्य ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये जोरदार खडाजंगी; सभागृहात नेमकं काय घडलं?
Aditya Thackeray vs Ashish Shelar : मुंबईतील विकासकामांवरून विधानसभेत आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.
Aditya Thackeray vs Ashish Shelar In Budget Session : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलंच घेरलं आहे. याशिवाय शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरूनही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. परंतु मुंबईतील विकासकामांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील रस्त्यांच्या कामात सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केल्यानंतर संतापलेल्या शेलार यांनी गेल्या २५ वर्षांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळं सभागृहातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं.
ट्रेंडिंग न्यूज
सभागृहात नेमकं काय झालं?
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील ४०० किमीच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होणारेत का?, कामच सुरू झालेली नसतील तर कंत्राटदारांना आगाऊ रक्कम देण्यात येऊ नये. या प्रकरणात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं. मुंबईत जिथं-जिथं रस्त्यांची कामं सुरू होतील, तिथं सीसीटीव्ही लावण्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं होतं. परंतु त्यात अद्याप कोणताही प्रगती झालेली नाही. याशिवाय कंत्राटदारांना ४८ टक्के आणि जीएसटीचा विषय सरकार कसा हाताळणार आहे?, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
आदित्य ठाकरेंना शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर....
आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले की, विधानसभेत कंत्राटदारांच्या ४८ टक्क्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यंदा राष्ट्रीय स्तरावरील कंपन्या मुंबईत आलेल्या आहेत. काही विशिष्ठ कंपन्यांना काम मिळालं नसल्यामुळं आदित्य ठाकरेंना पोटदुखी होत आहे. आम्ही कोणत्याही भ्रष्टाचारी कंपनीला काम देणार नसल्याचं सांगत शेलारांनी आदित्य ठाकरेंना टोला हाणला. गेल्या २५ वर्षात तब्बल १२ हजार कोटी रुपये मुंबईच्या रस्त्यांवर खर्च झालेले आहेत. मग गेल्या २५ वर्षातील विकासकामांचीही चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.