Navi Mumbai: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संजय राठोड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याच संस्थेला नवी मुंबईत भूखंड मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. राठोड यांच्या खाजगी सचिव यांनी सिडकोच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांना लिहिलेल्या पत्रामुळे या वादाला तोंड फुटले आहे.
या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री बोलत महायुती सरकारवर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, 'तब्बल ५०० कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या एक रुपये प्रती चौरस मीटरच्या किंमतीत मिळू शकतो. दुसऱ्यांच्या जमिनी फुकटात हडपू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या 'लाडका मंत्री' योजनेचा आणखी एक लाभार्थी महाराष्ट्रापुढे आला आहे.'
पुढे वडेट्टीवार म्हणाले की, '१ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने एक भूखंड श्री.संत डॉ.रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आल्याचा उल्लेख करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. मात्र, मंत्रिमंडळाची कोणतीही मान्यता न घेता हा निर्णय झाल्याचे आता समोर आले आहे. संजय राठोड यांच्या दबावात नवी मुंबई येथील 5 हजार ४०० चौ.मी. भूखंड श्री.संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल या ट्रस्टच्या नावाने वाटप करण्यात आला.मतांसाठी लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये दिले जात आहे आणि लाडक्या मंत्र्याला तब्बल ५०० कोटींचा भूखंड कवडीमोल भावात दिले जात आहे. महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरू आहे.'
दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये अखिल भारतीय बंजारा सेवा संघ या संस्थेने बंजारा समाजासाठी जमीन मिळावी, अशी मागणी केली. यानंतर राज्य सरकारने नवी मुंबईतील सिडकोच्या ताब्यात असलेला ५,६०० चौरस मीटरचा भूखंड श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल या संस्थेला दिला, ज्याचे प्रमुख संजय राठोड आहेत. मात्र, याआधी जून २०२३ मध्ये संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी मंत्र्यांच्या लेटर हेडवर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले. बंजारा समाजासाठी भूखंड निश्चित झाल्यानंतर तो श्री संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल संस्थेच्या नावाने वितरीत करण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली.
'बंजारा समाजासाठी समाजकार्य करू इच्छित असलेली दुसरी कोणतीही संस्था पुढे आल्यास हा भूखंड आपण त्यांना देऊ. ही जमीन नफा कमविण्यासाठी नाहीतर, सामाजिक कार्यासाठी मागण्यात आली. यात मंत्री म्हणून आपले काही हितसंबंध नाहीत. बंजारा समाजासाठी सामाजिक केंद्र उभारण्यास इच्छुक असलेल्या अनेक संस्थापैकीच आमचीही एक संस्था होती', अशा शब्दात संजय राठोड यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.