Vidya Chavan attacks Chitra Wagh : ‘भाजपच्या चित्रा वाघ या इतरांचा वापर सापशिडीसारखा करून पुढं जाणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी माझ्या सुनेला भडकवून आमच्याविरोधात आमच्या घरात भांडण लावलं. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे सगळं केलं,’ असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्यानं टीका करणाऱ्या वाघ यांचा विद्या चव्हाण यांनी जोरदार समाचार घेतला. चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लीपही ऐकवली. त्यात वाघ या चव्हाणांच्या सुनेला चिथावणी देत असल्याचा दावा त्यांनी केला. 'मी सुनेचा छळ कसा केला हे वाघ माझ्या सुनेला बोलायला सांगत आहेत. व्हिडिओ कसे टॅग करायचे हेही माझ्या सुनेला सांगत आहेत. माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं. या क्लिप्स माझ्याकडे पाच ते सहा महिन्यांपूर्वी आल्या आहेत. आम्ही कुणाच्यामध्ये बोलत नाहीत. आम्ही चांगलं काम करतोय असं वाघ वारंवार सांगतात. त्यामुळं आम्ही हा ऑडिओ ऐकवत आहोत, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या.
माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जे वाद झाले, त्यात वाघ आणि फडणवीसांचाही संबंध होता. चित्रा वाघ यांना ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं स्वत: चित्रा वाघ ऑडिओमध्ये बोलत आहेत. चित्रा वाघ सुनेचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करून देतात, त्यानंतर फडणवीस म्हणतात की, आपण या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ या तुम्हाला मदत करतील असं ते सांगतात, असंही विद्या चव्हाण यांनी सांगितलं.
एखाद्याच्या घरात काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं आणि नंतर म्हणायचं की, एक वकील आम्हाला सांगतोय, हे लोकं कशाप्रकारे त्रास देऊ शकतात? माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, अशा प्रकारे त्यांना खोटं बोलायला लावणं, सुनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं, असं सुरू आहे. असा आरोपही त्यांनी केला.
'बजेटमध्ये राज्याला भरभरून दिलं अशा थापा तुम्ही मारल्या आणि आम्ही फेक नरेटीव्ह करतो असा आरोप करता. शरद पवार साहेब पित्रुतुल्य आहेत असं सांगता, आता त्याच शरद पवार साहेबांवर टीका करतात. राज्याला ज्या पत्रकारांनी, समाजसेवकांनी दिशा दिली, त्यांचा उल्लेख पोपट असा करता. तुमच्यासारख्या खोटारड्या, बनेल, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्ती पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, हे आम्ही जवळून पाहिलं आहे, असं हल्लाच विद्या चव्हाण यांनी चढवला.
संबंधित बातम्या