मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम ३ हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यातील मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, हा आहेर थांबणार नाही असे भावनिक आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही योजना सुपरहिट असून दिवाळीपूर्वीच महिलांना भाऊबीज देण्यात आली आहे. आज सर्व महिला भगिनीच्या खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे जमा झाले आहेत. आज राज्यातील महिलांच्या खात्यात १७ हजार २०० कोटी रुपये जमा केले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, माझी भगिनी कष्ट करते, कुटुंबासाठी राबते याची आम्हाला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखाहुन अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे कौतुक करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले महिला व बालविकास विभागाने सचिव अनुपकुमार यांच्या नियंत्रणाखाली अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे.
लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
रायगडमधील या कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसला गोरेगावमध्ये अपघात झाला आहे. एक एसटी बस घसरली आहे. या सर्व महिलांवर तात्काळ उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.