मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gudi Padawa : नववर्ष प्रारंभ, गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

Gudi Padawa : नववर्ष प्रारंभ, गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 22, 2023 05:16 PM IST

CM Eknath Shinde on Gudi Padawa : मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत राज्यात विकासाची गुढी उभारण्याचा संकल्प केला.

CM Eknath Shinde on Gudi Padawa
CM Eknath Shinde on Gudi Padawa

मुंबई " आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवे वर्ष आरोग्यदायी ठरावे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्यानिमित्त शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. या निमित्ताने आपण ऋतुचक्रातील बदलाचा आनंददायी उत्सव साजरा करतो. अशा या नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्न करूया.

नववर्षाचे स्वागत करताना आपण पर्यावरणाचे भान देखील बाळगूया. आपल्या परिसरात स्वच्छता राखूया. पाणी, हवा यांचं प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण व्हावी, असे प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मनामनांत नवसंकल्पनांची पालवी फुलावी, हीच सदिच्छा. महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी उंच उभारूया, तिची पताका जगाच्या क्षितीजावर अभिमानाने आणि डौलाने फडकत रहावी, असा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग