Eknath Shinde : ‘मोदी-शहा ज्यांना मुख्यमंत्री करतील ते मान्य…' एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : ‘मोदी-शहा ज्यांना मुख्यमंत्री करतील ते मान्य…' एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला

Eknath Shinde : ‘मोदी-शहा ज्यांना मुख्यमंत्री करतील ते मान्य…' एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला

Nov 27, 2024 04:48 PM IST

मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मुख्यमंत्रीपदाबाबत माझी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्यात अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबतचा घोळ कायम आहे. परंतु मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेत मी स्पीड ब्रेकर नसून माझी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ठाण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला आणि माझ्या पक्षाला मान्य असेल असं शिंदे यांनी स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्रीपदावरून मी नाराज नाही. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. महायुतीचा एवढा मोठा विजय झाला आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत घेतली होती. मी स्वतः काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. राज्यात सरकार बनवताना माझी कुठलीही अडचण नाही. त्यांनी मला अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत काय तो निर्णय तुम्ही घ्यावा. एनडीएचे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय शिवसेनेला मान्य असेल.' असं मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं असल्याचं शिंदे म्हणाले. 

भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी मार्ग मोकळा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भाजपला पक्षाचा मुख्यमंत्री करण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपमधून देवेंद्र फडणीवस यांच्या नावावर सर्वसम्मती तयार होत असून फडणीवस हे नवे मुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भाजपमधून फडणवीस व्यतिरिक्तही काही नावांची चर्चा सुरू आहे.

शिंदेंंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

दरम्यान, राज्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिल्यास एकनाथ शिंदे यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या भूमिकेचं भाजपकडून स्वागत

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राला पुढे नेण्याची असल्याचे बावनकुळे म्हणाले. शिंदे हे लढवय्ये नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्यात महायुती मजबूत केली असल्याचे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह निर्णय घेतील असं ते म्हणाले.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर