मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : सरकारमधील वाचाळ मंत्र्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं, म्हणाले...

Eknath Shinde : सरकारमधील वाचाळ मंत्र्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 24, 2023 02:08 PM IST

Chief Minister Eknath Shinde : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मंत्री तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत फटकारलं आहे.

Eknath Shinde On Abdul Sattar And Tanaji Sawant
Eknath Shinde On Abdul Sattar And Tanaji Sawant (PTI)

Eknath Shinde On Abdul Sattar And Tanaji Sawant : विरोधकांवर आरोप करताना खालच्या भाषेत टीका करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर आता एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचाळ नेत्यांना आणि मंत्र्यांवर चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्यामुळं आता बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात अनेक राजकीय पक्ष राजकारण करतात. परंतु प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांविरोधात बोलताना पातळी सोडता कामा नये. कोणत्याही नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृतीला बाधा पोहचेल असं कोणतंही वक्तव्ये करणं चुकीचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील वाचाळ नेत्यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टोला हाणला आहे. कायद्यानं एखाद्या नेत्यावर बंधनं घालन काहीही होणार नाही. प्रत्येकानं आपण काय करतोय किंवा काय बोलतोय, याचं आत्मपरिक्षण करायला हवं. कारण वाईट बोललेलं लोकांना आवडत नाही. त्यामुळं आपल्या कामातून विरोधकांना उत्तर देत कर्तृत्व सिद्ध करायला हवं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी वाचाळ मंत्र्यांना दिला आहे.

मी कधीही कुणावर पातळी सोडून बोलत नाही. सामान्य कार्यकर्ता असल्यामुळं माझ्यावर कुणीही आरोप केले तरीही मी त्यांना कामातून उत्तर देतो, मी चांगलं काम करत असल्यामुळंच राज्यातील दीड हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत आम्हाला सत्ता मिळाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांचा पाठिंबा वाढत असल्याचं पाहून मला अभिमान वाटतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे सरकारमधील कोणत्या नेत्याला मीस करताय?, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि सगळं काही सांगायचं नसतं, असं म्हणत कॉंग्रेसला चिमटा काढला.

IPL_Entry_Point