मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द

Oct 08, 2024 01:51 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक तब्येत बिघडल्याने आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठीचा आजचा सोलापूर दौरा आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. सर्व कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज, मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. ऐन विधानसभेची निवडणुक जाहीर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे. विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या प्रचार-प्रसारात सतत व्यस्त असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘ओव्हर एक्सर्शन’ मुळे आज मगळवारी सकाळी तब्येत बिघडल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यात मुंबई बाहेर सोलापूर शहरात येथील होम मैदानावर होणारा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रचार व प्रसाराचा प्रमुख कार्यक्रम होता. आता हा कार्यक्रम देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

मुख्यमंत्री आज सकाळी १०.३० वाजता मुंबई मंडळाच्या विविध गृहप्रकल्पातील सदनिकांच्या वितरणाच्या सोडत कार्यक्रमासाठी व्ही.सी.द्वारे उपस्थित राहणार होते. परंतु या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते. हा कार्यक्रम मुंबईतील नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा प्रारंभ होणार होता. यात ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या प्रचार व प्रसार कार्यक्रमात सामील होणार होते. सोलापुरातील होम मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे. 

त्यानंतर मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेसाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याच ठिकाणी महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) संचालक मंडळाची बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते.

मालदीवच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझु यांचा चार दिवसांचा भारत दौरा सुरू झाला आहे. मुईझु हे त्यांच्या शिष्टमंडळ समवेत दिल्लीहून आज मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुईझु यांच्या स्वागतार्थ राजभवन येथे आयोजित स्नेहभोजनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानंतर मुंबई शहरात कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तो आज रद्द करण्यात आला आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर