मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाचे ४० आमदार आज गुवाहाटी दौऱ्यावर; विरोधकांची टीका

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाचे ४० आमदार आज गुवाहाटी दौऱ्यावर; विरोधकांची टीका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 26, 2022 07:59 AM IST

Eknath Shinde Guwahati Visit : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज मुख्यमंत्री समर्थक आमदारांसह गुवाहाटीत दाखल होणार आहेत.

Eknath Shinde Guwahati Visit
Eknath Shinde Guwahati Visit (HT)

Eknath Shinde Guwahati Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटातील ४० आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज सकाळी २६/११ च्या घटनेत शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांसह एअर इंडियाच्या विशेष विमानानं गुवाहाटीत दाखल होणार आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आज विदर्भाच्या दौऱ्यावर असून संध्याकाळी ते चिखलीत जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळं आता दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

आज सकाळी आठ वाजता शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार मुंबई विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे नातेवाईक, कर्मचारी, ४० आमदार आणि १३ खासदार मुंबईहून गुवाहाटीसाठी उड्डाण करतील. दुपारी चार वाजता मुख्यमंत्री शिंदे हे गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची पूजाही केली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आसामच्या मुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रश्नांविषयी गांभीर्य नसल्याचं म्हटल आहे. शिवसेनेतील बंड यशस्वी होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीकडे नवस केला होता. त्यामुळंच हा दौरा होत असल्यानं विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदेंनी घेरलं आहे.

IPL_Entry_Point