अवघ्या ८ महिन्यांत पडलेला शिवरायांचा सिंधुदुर्गातील पुतळा साकारणारा जयदीप आपटे आहे कोण?-chhatrapati shivaji statue collapse who is jaydeep apte contractor under lens after mishap in sindhudurg ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अवघ्या ८ महिन्यांत पडलेला शिवरायांचा सिंधुदुर्गातील पुतळा साकारणारा जयदीप आपटे आहे कोण?

अवघ्या ८ महिन्यांत पडलेला शिवरायांचा सिंधुदुर्गातील पुतळा साकारणारा जयदीप आपटे आहे कोण?

Aug 27, 2024 02:24 PM IST

Who Is Jaydeep Apte: दोन फुटांपर्यंत पुतळा उभारण्याचा अनुभव असलेल्या जयदीप आपटेला शिवरायांचा इतका मोठा पुतळा बनवण्याची जबाबदारी कशी सोपवण्यात आली?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळला

Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकार अडचणीत आले असून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर जयदीप आपटे नावाचा तरुण चर्चेत आला आहे. ज्याने या पुतळ्याची उभारणी केली. जयदीप आपटेला फक्त दोन फुटांपर्यत पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. असे असतानाही जयदीप आपटेला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचे कंत्राट का देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जयदीप आपटे हा कोण आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी राजकोट किल्ल्यावर करण्यात आले होते. सिंधुदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी ठेकेदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११०, १२५, ३१८ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदल दिनी आठ महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेला हा पुतळा सिंधुदुर्गातील नागरिकांना समर्पित होता. भारतीय नौदलाने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. पुतळा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने नौदलाला २ कोटी ३६ लाख रुपये दिले. मात्र, कलाकारांची निवड, त्याचे डिझाईन ही सर्व प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केली. ८ सप्टेंबर २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती.

कोण आहे जयदीप आपटे?

जयदीप आपटे अवघ्या २५ वर्षाचा तरूण असून कल्याण येथील रहिवाशी आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा २८ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. इतका मोठा पुतळा बनवण्यासाठी साधारणत: ३ वर्षांचा कालावधी लागतो, असे तज्ज्ञाचे मत आहे. परंतु, हा पुतळा अवघ्या सात महिन्यात पूर्ण करण्यात आला. म्हणजेच गेल्या वर्षी जून महिन्यात हा पुतळा बनवण्यास सुरुवात झाली. तर, डिसेंबर २०२३ पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे यांनी स्वत: एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली.मुलाखतीत दिली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. औरंगजेब आणि मोगलांनीही शिवाजी महाराजांचा असा अपमान केला नाही, असा दावाही त्यांनी केला. या घटनेला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. १९३३ मध्ये मुंबईतील गिरगाव चौपाटीवर समाजसुधारक लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात आला, पण तो आजही उभा आहे. १९५६ मध्ये पंडित नेहरूंनी प्रतापगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि तो आजही त्याच अवस्थेत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

विभाग