‘JNU’ मध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘JNU’ मध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर

‘JNU’ मध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर

Mar 15, 2024 12:22 AM IST

Shivaji Maharaj Study Centre in JNU: दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे. यामध्ये महाराजांचे चरित्र,धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास केला जाणार आहे.

जेएनयूमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र
जेएनयूमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र जेएनयूमध्ये उभारले जाणार आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र (Study Centre) उभारले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून दिल्लीत हे स्टडी सेंटर उभे रहात आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली आझादी का अमृतमहोत्सव समितीची बैठक पार पडली या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून  हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरित केला जाणार आहे.

या अध्यासन केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा युद्धातील पराक्रम तसेच त्यांचा राज्य कारभार,  देशातील विविध भागातील परकीय आक्रमण मोडून काढत स्वकीय राज्य उभारण्यास केलेले योगदान, त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचा आणि राज्य कारभाराचा देशाच्या राजकारणावर आणि समाजमनावर झालेला परिणाम,  महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, व्यवस्थापनाची तत्वे,  शिक्षण, संस्कृती,  मंदिरे, व्यापार,  त्यांचे राज्य कारभारातील तत्वज्ञान, त्यांनी उभारलेली सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा, स्व-भाषेला राज्य कारभारात दिलेले महत्व,  परराष्ट्र धोरण,  शेती,  जलसंधारण आणि सिंचन, गाव वस्त्या व शहरांचे व्यवस्थापन आणि नियोजन, संरक्षण यंत्रणा या सर्व बाबतीतले धोरणे व व्यवस्थापन, परकी आक्रमकांबाबतचे धोरण, संत महात्म्यांबाबतचे धोरण अशा विविध अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक होऊन यंदाचे ३५० वे वर्षे असून यानिमित्तत  राज्य शासनाकडून राज्यभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. याच प्रयत्नातून  दिल्लीतील जेएनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करणारे अध्यासन उभारले जात आहेस

जेएनयूतील या केंद्रासाठी अभ्यासक्रम तयार करणे, विषय मांडणी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबीतील संशोधनासाठी राज्य शासन जेएनयू सोबत सहकार्य करणार आहे. या स्टडी केंद्रात अंतर्गत सुरक्षा, पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती,  गनिमी कावा किल्ल्यांच्या तटबंदी संदर्भातील रणनीती, मराठा इतिहास या विषयावर संशोधनात्मक कार्य होणार आहे. तसेच मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी) ची सुविधा तसेच मराठा साम्राजाची सैन्य व्यूहरचना, किल्ले व तटबंदी रचना यावरील अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार हे अध्यासन कार्य करणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर