Rahul Gandhi on Kolhapur : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. 'शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामागे संदेश होता. तो संदेश असा होता की भाजपची विचारधारा चुकीची आहे. त्यांची नियत चांगली नसल्यामुळंच हा पुतळा पडला, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 'शिवाजी महाराज ज्या विचारधारेविरोधात लढले, त्याच विचारधारेविरोधात आज काँग्रेस पक्ष लढत आहे. त्यांनी (भाजपनं) शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि काही दिवसांनी पुतळा तुटून खाली पडला. त्यांचा हेतू चुकीचा होता. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा असेल तर शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं रक्षण करावं लागेल, संविधानाचं रक्षण करावं लागेल, असा संदेश या पुतळ्यानं त्यांना दिला, असं राहुल गांधी म्हणाले.
आज देशात एक विचारधारा संविधान नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतेय. शिवरायांचा विचार कसा संपवला जाईल याचा प्लानिंग हे लोक करतात. देशातील घटनात्मक संस्थांवर हल्ले करतात. लोकांना घाबरवतात. धमकवतात आणि नंतर जाऊन शिवरायांच्या पुढं नतमस्तक होता. ह्याला काही अर्थ नाही. ही तीच विचारधारा आहे, ज्यांनी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. याच विचारधारेनं आदिवासी राष्ट्रपतींना राम मंदिर आणि संसदेच्या उद्घाटनाला उपस्थित राहू दिलं नाही. ही राजकीय लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. ही खूप जुनी लढाई आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
पुतळा पाडल्यानंतर शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची माफी मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी निशाणा साधला. लोकांना घाबरवून, देशातील संविधान आणि संस्था उद्ध्वस्त करून शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन उपयोग नाही. 'यापुढं कुणी तुम्हाला म्हणाला की मी शिवाजी महाराजांना मानतो, तर त्याला प्रश्न विचारा की तुम्ही संविधानाला मानता का? गरिबांचा विचार करता का? संविधानिक संस्थांचं रक्षण करता का?, असं राहुल गांधी म्हणाले.
२६ ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.