Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजी नगर येथील पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ५० पेक्षा अधिक मुलांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांना बिस्किटे खाल्ल्यावर उलट्या, मळमळ आदी त्रास होऊ लागला. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आजारी पडल्याने त्यांना तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही मुलांची प्रकृती ही गंभीर आहे तर काही मुलांची प्रकृती ही स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेचे वृत्त असे की पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेत आज बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मुलांनी ही बिस्किटं खाल्ली. यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवून लागला. काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. तर काही विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. तर काही विद्यार्थ्यांना ताप देखील आला. तब्बल ५० हून अधिक मुलांना त्रास होऊ लागल्याने शाळेतील शिक्षकांनी त्यांना तातडीने जवळील पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने मुलांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यातील काही मुलांना सलाइन लावण्यात आले आहे. ओकाऱ्या झाल्याने मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांची प्रकृती ही गंभीर झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही स्थिर आहे.
मुलांना बिस्किट वाटल्यावर ५० पेक्षा अधिक मुलांना त्रास झाला. त्यांना दवाखान्यात भरती केल्यावर त्यांना बिस्कीटातूनच विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे पालकांनी नाराजी व्यक्त करत शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जिल्हा परिषद शाळेत मुलांना बिस्किटे देण्याआधी त्यांची मुदत तपासण्यात आली होती का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी देखील पालकांनी केली आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परीक्षेच्या शिक्षण विभागाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे पालक घाबरले आहेत.