Chhatrapati Sambhajinagar Rickshaw driver News: बदलापूर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असताना राज्यात महिला आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेईना. आता संभाजीनगरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली. अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर पँट काढून अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला सहा दिवसानंतर अटक केली आहे. या घटनेतील आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. मात्र, या घटनेनंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
समीर बाबा पठाण असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर, पीडित मुलगी छत्रपती संभाजीनगर शहरातील पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकते. पीडिता आरोपीच्या रिक्षातून जात असताना त्याने तुला पैसे लागतात का? असे तिला विचारले आणि त्यानंतर तिच्यासमोर पँट काढून अश्लील कृत्य केले. याप्रकरणी पीडिताने आरोपीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी आपला तपास सुरुच ठेवला आणि सहा दिवसानंतर त्याला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मुंबईतील मालाड परिसरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. घरात कोणी नसताना जन्मदात्या पित्याने पोटच्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या घटनेला दोन महिने उटल्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर पीडिताच्या आईने आरोपीविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जून महिन्यात घरी कोणी नसताना आरोपी पित्याने पोटच्या मुलीवर बलात्कार केला. एवढेच नाही तर ही गोष्ट कोणाला सांगू नको, अशीही धमकी दिली. त्यामुळे पीडिताने घाबरून या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ६५ (२), ६८ (अ) आणि पोक्सो कायद्यातील ४,१०,१३ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.