विवाहबाह्य संबंधातून अनेक गुन्हे घडल्याच्या घटना घडत असतात. मुलांना टाकून आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटनाही यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तीन मुलींचे आईवडील आपआपल्या विवाहबाह्य पार्टनरला घेऊन पळून गेले आहेत. यामुळे तीन मुली आई-वडिल जिवंत असतानाही पोरक्या झाल्या आहेत.
या तीन चिमुकल्यांना सोडून आई प्रियकरासह, तर वडील त्याच्या प्रेयसीला घेऊन घरातून पसार झाले आहेत. ही संताप आणणारी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात घडली आहे. दोघेही घरातून पळून जाऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. आई-वडील मुलांना वाऱ्यावर सोडून गेल्याने आपल्या माता-पित्याची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे सातारा परिसरात एका भाड्याच्या घरात रहात होते. त्यांना तीन मुली असूनही दोघांचेही बाहेर अनैतिक संबंध सुरू होते. दोघेही घर सोडून आपापल्या प्रियकर आणि प्रेयसीकडे रहायला गेले.
पळून गेलेल्या या पती-पत्नीच्या कुटूंबीयांचा काहीच पत्ता नसल्याने गेल्या जवळपास तीन महिन्यापासून घरमालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलींचा सांभाळ केला आहे. बालकल्याण समितीला ही माहिती समजल्यावर सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही आई-वडिलाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. मुलींकडे त्यांचे लक्ष नसायचे तसेच दोघेही मुलांना मारहाण करायचे. तीन महिन्यापासून पसार झालेले आपले जन्मदाते येतील या आशेवर या मुली रोजचा दिवस काढत आहेत. या मुली बालकल्याण समितीच्या आदेशाने छावणीच्या बालगृहात वास्तव्य करत आहे.