Chhatrapati Sambhajinagar Honor Killing : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा भावानेच खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता गणेश शेरकर (वय १७ वर्ष) असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ऋषिकेश तानाजी शेरकर (वय २५) असं आरोपी भावाचं नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
घर सोडून गेलेली बहीण काही दिवसानंतर घरी परत आली. त्यानंतर चुलत भावाने तिला डोंगरावर नेलं व खाली ढकलून दिलं. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती. त्यावेळी तिने घरच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही शहागड पोलिसांना दिली होती. काही दिवसांनी मुलगी आपल्या घरी परतली. त्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते.
तिच्या काकांनी मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण चुलत भावाच्या मनात ती पळून गेल्याचा राग होता. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला तेथून खोल दरीत ढकलून दिले, त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
भावाने बहिणीची हत्या केल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोक व पोलिसांच्या पथकाने मुलीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्रेम प्रकरणातूच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केला आहे.
संबंधित बातम्या